The Authoritative Voice of India's Liquor IndustryFriday, 20 November 2026
HomeCurrent Affairsहॉटेलच्या मागील खोलीत गोवा बनावटीच्या दारूचे अवैध बॉटलिंग; १ कोटी ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Enforcement

हॉटेलच्या मागील खोलीत गोवा बनावटीच्या दारूचे अवैध बॉटलिंग; १ कोटी ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

राजापूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; दोघे ताब्यात, हजारो रिकाम्या बाटल्या आणि बॉटलिंगचे साहित्य जप्त

ब्युरो रिपोर्ट/ वार्ताहर डेस्क
|September 17, 2026|5 मिनिटे|
हॉटेलच्या मागील खोलीत गोवा बनावटीच्या दारूचे अवैध बॉटलिंग; १ कोटी ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

राजापूर तालुक्यातील तळगाव येथे हॉटेलच्या मागील खोलीत सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या दारूच्या कथित अवैध बॉटलिंगचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग भरारी पथक आणि कणकवली येथील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल १ कोटी ५ लाख ८१ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जागामालक दिनेश शांताराम जैतापकर आणि चंदन ऊर्फ शंकर बाळू पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

राजापूर तालुक्यातील तळगाव येथील श्री स्वामी समर्थ हॉटेलच्या मागील खोलीत गोवा बनावटीच्या दारूचा साठा करून त्याचे अवैध बॉटलिंग केले जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर पथकाने पंच आणि कर्मचाऱ्यांसह छापा टाकला. कारवाईदरम्यान खोलीत रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे लेबल असलेले ५६ बॉक्स आढळले. तसेच ३० लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक कॅनमध्ये नारंगी रंगाचे तयार मद्याचे ब्लेंड, असे एकूण ६० लिटर मद्य आढळून आले.

या ठिकाणी बॉटलिंगसाठी वापरली जाणारी मशीन, ८६ हजार ४०० पत्र्याची बुचे, मोठ्या प्रमाणात रिकामे बॉक्स आणि कागदी पुठ्ठे जप्त करण्यात आले. याशिवाय १,८०० बॉक्समध्ये ठेवलेल्या ८६ हजार ४०० रिकाम्या बाटल्या, तसेच १८० मिली क्षमतेच्या आणखी १,६८० रिकाम्या काचेच्या बाटल्या आढळून आल्या. ओशियन रॉक प्रीमियम ग्रेन व्हिस्कीच्या लेबलचा रोलही जप्त करण्यात आला.

छाप्यात ५०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, १ हजार लिटर क्षमतेच्या तीन प्लास्टिक टाक्या, २५ प्लास्टिक ट्रे, १२० पुठ्ठ्याचे बॉक्स, १२३ रिकाम्या गोण्या, टेबल-खुर्च्या, लोखंडी ट्रॉली, मोटर, होजपाईप, रॅक आणि बॉटलिंगसाठी लागणारे अन्य साहित्य जप्त करण्यात आले. दोन मोबाईल संचही कारवाईत ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेले मद्य आणि बॉटलिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य यांची एकत्रित अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख ८१ हजार ५४० रुपये असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.

या प्रकरणी तळगाव येथील जागामालक दिनेश शांताराम जैतापकर आणि गोव्यातील पणजी परिसरातील चंदन ऊर्फ शंकर बाळू पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींना राजापूर न्यायालयात हजर करून पाच दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात येणार असल्याचे भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर यांनी सांगितले.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि रत्नागिरीच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर करीत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात हातभट्टी दारूची निर्मिती किंवा विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक अथवा साठा, तसेच बनावट मद्याची निर्मिती किंवा विक्री आढळल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

Tags:राजापूररत्नागिरीअवैध बॉटलिंगबनावट दारूगोवाउत्पादन शुल्कभरारी पथकजप्तीRajapurRatnagiriIllegal BottlingFake LiquorGoaExcise DepartmentFlying SquadSeizureMaharashtra EnforcementCounterfeit LiquorMaharashtra State ExciseState Liquor Lawsमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कराज्य मद्य कायदे

स्रोत (Sources)

  1. Ratnagiri 24 News — राजापूर तालुक्यातील अवैध बॉटलिंग कारवाईचे वृत्त
    https://ratnagiri24news.com